'मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी' (Mobile Number Portability) | आगळं! वेगळं !!!

'मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी' (Mobile Number Portability)

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी' उर्फ (Mobile Number Portability)आता लवकरच येत आहे. त्याच्या प्रसूतीकळा काही कंपन्यांना यायला ही लागल्या आहेत. तेव्हा याचा जन्म झाल्याची वार्ता (हायटेक भाषेत 'फ्लॅश न्यूज, ब्रेकिंग न्यूज' म्हणा हवं तर) कधीही येऊ शकते.

तुम्ही म्हणाल की यात एवढे प्रतीक्षा करण्यासारखे काय आहे? अर्थात त्याला कारणेही तशीच आहेत. मोबाईल हा आता प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे यात शंकाच नाही.

आपण पहिला मोबाईल हँडसेट घेतो तेव्हाच आपल्या आवडीचा एक 'मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर' निवडतो. काही दिवस जातात तसे नव्या नवलाईचे दिवसही संपतात. मग आत्ताच घेतलेला हँडसेटही जुना वाटायला लागतो. मग दुसरा एक नविन हँडसेट, पुन्हा त्याचे कौतुक.

तसे पहिले तर हीच गोष्ट 'मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर'च्या बाबतीतही लागू होते. पण फरक इतकाच की हँडसेटप्रमाणे 'मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर' मात्र लगेच बदलणे कठीण होते. हँडसेटप्रमाणेच काही दिवसात आपण वापरत असलेल्या कंपनीच्या सेवेतील गुणदोष आपल्या लक्षात यायला लागतात.

इकडे तर मार्केटमध्ये नविन ग्राहक गळाला लावण्याची सर्व कंपन्यांची स्पर्धा सुरूच असते. त्यासाठी नविन आकर्षक योजनांच्या जाहिरातींचा भडीमार सतत सुरु असतो. आपण आधीच आपल्या कंपनीच्या सेवेबाबत काही बाबतीत नाराज असतोच. मग आपण इतर कंपनीच्या जाहिरातीशी आपल्या कंपनीची नकळत तुलना करायला लागतो.

उदाहरणार्थ, अमुक एक कंपनी एक पैसा बिलिंगसाठी अमुक इतकाच चार्ज करते, डोकोमो कंपनी तर कोणताही चार्ज न लावताच एक पैसा सेकंदाचे बिलिंग करते, आणि साला आपली आयडीया कंपनी तर एक पैसा बिलिंगसाठी चार्ज आकारून फक्त स्वतःच्याच नेटवर्कसाठी एक पैसा बिलिंग आणि इतर नेटवर्कसाठी १.२ पैसा बिलिंग करते. तसेच डोकोमो इंटरनेट सेवेकरिता एक महिन्यासाठी पंच्याण्णव रुपये आकारून सहा जीबी डाऊनलोडची सुविधा देते, आणि त्यापुढील प्रत्येक एमबी वापरासाठी पन्नास पैसे इतका चार्ज आकारते, तर आपण वापरत असलेली आयडियाची इंटरनेट सेवा दरमहा अठ्ठ्याण्णव रुपयांत फक्त दोन जीबी, त्यातही रोजच्या वापरावर सत्तर एमबीचे बंधन व त्यापुढील प्रत्येक एमबी वापरासाठी पाच रुपये कापून आपल्या बॅलन्सचा मुडदाच पाडते. शिवाय डोकोमोप्रमाणे इंटरनेटसह इतर सर्व प्रकारचा बॅलन्स केवळ एका एसएमएसद्वारे तपासण्याची आपल्या आयडीयात सोय नाही.

छे वैतागलो बुवा या आयडीयाला. अशाप्रकारे आपण मनाशी चरफडत असता. पण आपला नाईलाज असतो. इतर कंपन्यांच्या काही सेवा कितीही आकर्षक वाटल्या तरी, किती सिमकार्ड गोळा करणार? किती हँडसेट जवळ बाळगणार? बरं, 'मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर' बदलायचा म्हटलं तर सध्याचा मोबाईल क्रमांक बदलणार त्यामुळे पुन्हा पंचाईत. अशा प्रकारे आपण अडचणीत येत असतो.

काही जण मागचा पुढचा विचार न करता पहिले सिमकार्ड टाकून देतात आणि सरळ दुसरा 'मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर' निवडतात, आणि हव्या असलेल्या सेवेचा आनंद घेतात, पण बहुतेकांची मात्र क्रमांक बदलू नये म्हणून 'अपरिहार्यता' असते. त्यामुळे ते मनापासून इच्छा असूनही 'मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर' बदलू शकत नाहीत.

पण आता 'मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी'मुळे ते शक्य झाले आहे. आपला सध्याचा असलेला क्रमांक कायम ठेवून आपणांस पाहिजे असलेला मनपसंत 'मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर' आता आपण निवडू शकता.

आणि यामुळेच सर्वत्र याची चर्चा आहे आणि प्रतीक्षाही. आणि आता ती वेळही जवळ आली आहे. तेव्हा बहुतेक तुम्हीही याचा लाभ घेण्याच्या विचारात असालच, आणि तुमचा नविन 'मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर' ही तुम्ही आधीच चॉइस करून ठेवला असेलच. तर आता आपण  कोणत्या 'मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर'ला प्राधान्य देणार आहात ते पाहायचे आहे.

 लेटेस्ट अपडेट वाचा : देशभरात मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी सुरु

0 Comments:

Post a Comment