2020 | आगळं! वेगळं !!!

केवळ तीन हजारात Illustrator corel draw यांना पर्यायी सॉफ्टवेअर

 

सध्या ग्राफिक डिझाईनसाठी कोरेल ड्रॉ, अॅडोबी इलस्ट्रेटर आणि फोटोशॉप ही सॉफ्टवेअर्स प्रामुख्याने वापरली जातात. ही सॉफ्टवेअर्स लोकप्रिय झाली तशी या कंपन्यांनी लाईफटाईम लायसेन्सीऐवजी सबस्क्रिप्शन पध्दतीने म्हणजे दरमहा सुमारे १७०० रुपये किंवा वार्षिक सुमारे २०००० रुपये वर्गणी या दराने आकारणी सुरु केली. तर कोरेल ड्रॉ ग्राफिक सूटसाठी दरमहा सुमारे २६०० किंवा वार्षिक ३१००० रुपये आकारते.आणि कोरेल ड्रॉ ग्राफिक सूट साठी लाईफटाईम लायसेन्सी ७५००० हजार रुपयांत मिळते.


ज्यांना व्यावसायिक कारणांसाठी या सॉफ्टवेअर्सचा उपयोग करायचा आहे, त्यांचे उत्पन्नही तसेच असल्यामुळे त्यांना या किंमती परवडतात. आणि काही छोट्या व्यावसायिकांना त्या परवडत नसल्यातरी अधिकृतपणे सॉफ्टवेअर्स वापरण्यासाठी तितके पैसे खर्च करावेच लागतात.


मात्र ज्यांचा उपयोग व्यावसायिक कारणांसाठी नसून हौसेखातर आहे, आणि त्यांची इच्छा असली तरी ते इतके पैसे या सॉफ्टवेअर्सवर खर्च करु शकत नाहीत. अशा लोकांसाठी माफक किंमतीत या सॉफ्टवेअर्सचे इतर पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी inkscape हे open source असून ते पूर्णतः मोफत उपलब्ध आहे. आणि इतर पर्यायापैकी Affinity Designer हे vector graphic software साडेचार हजार रुपये इतक्या माफक किंमतीत उपलब्ध आहे.


Affinity Designer डाऊनलोड करुन त्याची दहा दिवस मोफत चाचणी घेता येते. मी डाऊनलोड करुन घेतले होते, त्यावेळी त्याची किंमत ३९९९ रुपये इतकी दर्शवत होती. त्यानंतर दहा दिवस पूर्ण होण्याआधीच त्याची किंमत ४४९९ इतकी झालेली दिसली.


पण आता सध्या त्या Serif कंपनीने ब्लॅक फ्रायडे ऑफर मध्ये त्यांच्या सर्व उत्पादनावर ३०% सवलत जाहिर केली आहे. त्यामुळे या सवलतीत Affinity Designer हे केवळ ३०९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकेल. त्यातूनही आणखी एक फायदा करुन घ्यायचा असल्यास buy now च्या खाली scroll down केल्यास तिथे खाली Also available from Microsoft Store अशी एक सूचना दिसेल त्यापुढे Get from Microsoft असा चौकोन दिसेल त्यावर क्लिक केल्यास Microsoft store चे पेज ओपन होईल. तिथे हेच Affinity Designer २७९९.३० इतक्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध असल्याचे दिसेल.


Serif कंपनीच्या Affinity Designer ची काही वैशिष्ट्ये अशी की, याला कमी जागा लागते, कमी वेळात चालू बंद होते, Vector आणि Raster या दोन्ही मोडवर सिंगल क्लिकमध्ये जाता येते, अनलिमिटेड आर्टबोर्ड, Eps, jpeg, pdf, svg, psd, png, tiff, gif इत्यादी सगळ्या प्रकारच्या फाईल फॉरमॅटस् ना सपोर्ट करते. 


याची किंमत ही लाईफटाईम लायसेन्सीची असून, अपडेटस चा सपोर्ट आहे. याच कंपनीची Affinity photo, publisher अशी आणखीही सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत. ज्यांना याविषयी कल्पना नाही, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचावी हा या लेखामागचा हेतू आहे. ज्यांना स्वारस्य असेल त्यांनी दहा दिवसांची मोफत चाचणी आवृत्ती डाऊनलोड करुन घेऊन, वापरुन बघायला हरकत नाही. कंपनीने दिलेली ही खास ३० टक्के सवलत ६ डिसेंबर २०२० पर्यंत सुरु असेल. खाली लिंक दिली आहे.


सदर सॉफ्टवेअर विषयी ट्युटोरियल्स युट्युबवर उपलब्ध आहेत.

https://affinity.serif.com/en-us/

कोरोना : प्रत्येकाचे टेन्शन वेगळे
आज सकाळी सकाळीच सुरेशचा व्हिडिओ कॉल आला. मी विचारात पडलो, की बुवा याने आज सकाळी सकाळीच व्हिडिओ कॉल कसा काय केला?
बोला सुरेश शेठ, आज सकाळी सकाळीच व्हिडिओ कॉल? काय विशेष?
गरीबी फार वाईट असतेनिराशेने आडवी मान हलवीत सुस्कारा सोडत तो म्हणाला.
का रे काय झालं? कुणाबद्दल बोलतोय तू? त्याचं हे रुप मला नविनच होतं.
आता मी अजून दुसऱ्या कुणाबद्दल बोलणार? माझ्याबद्दलच बोलतोय.
काय सुरेश शेठ, आज कुणी भेटलं नाही का? गरिबी कशाला म्हणतात ते तरी माहिती आहे का?
करा चेष्टा, इथं मी काय दुःखात आहे, ते राहिलं बाजूलाच आणि... जाऊ द्या गरिबांची थट्टा करायची जगाची रितच आहे म्हणा. पुन्हा सुस्कारा सोडत सुरेशच्या तोंडातून निराश सूर बाहेर पडले.
हे बघ सुरेश, थट्टाबिट्टा काही नाही, तुला काय म्हणायचयं ते मला नाही समजलं. जरा स्पष्ट बोलशील का? असं कोड्यात बोलू नको गड्या.
आता तुझ्यापासून काय लपवायचयं? तुला सगळं सविस्तरच सांगावं लागेल.
तेच म्हणतोय मी काय झालं ते स्पष्ट सांग.
सांगतो सांगतो ऐक नीट. या कोरोनामुळे बाजारपेठा बंद होतील याची कुणकुण मला आधीच लागली होती. पण खात्री वाटत नव्हती, तरीही मी रविवारी अडचण येऊ नये म्हणून एक आधीच आणून ठेवली होती.
काय आणून ठेवली होती?
अरे तुला तर माहित आहेच ना, मी फक्त रविवरीच एक क्वॉर्टर घेतो ते. त्यामुळे मी माझी एक क्वॉर्टर आधीच घरी आणून ठेवली होती.
सुऱ्या चक्क तू घरी आणून ठेवली? आणि वहिनी कसं काय काही बोलल्या नाहीत तुला?
बोलली रे, पण मी तिला समजावलं, मी या आधी कधी घरी आणलीय का? मी कधी घरी घेतो का? फक्त एवढ्या बंदमुळेच आणलीय. मग मात्र त्यावर ती काही बोलली नाही.
मग थोडासा पॉज घेऊन सुरेश पुढे बोलू लागला, मोदीजींनी २२ तारखेला रविवारी सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत जनता कर्फ्यू जाहिर केला. मग मी विचार केला म्हटलं ठीक आहे, रात्री ९ नंतर दर रविवारप्रमाणे बाहेरच जाता येईल, घरी घ्यायला नकोच. आणि जी एक आणून ठेवलेली आहे,  ती पडेना का तशीच.
मग अडचण कुठे आली? मी त्याला विचारले.
अरे काय सांगू तुला, अचानक ३१ मार्च पर्यंत बाजारपेठा बंद करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश शुक्रवारी संध्याकाळी मला व्हॉटसअपवर वाचायला मिळाला. तसे मी कॅलेंडर बघितले आणि आपण एकच क्वॉर्टर आणून चूक केली असे वाटायला लागले. म्हणून मग आणखी एक क्वॉर्टर २९ तारखेच्या रविवारसाठी मी आणून ठेवली.
भागलं की मग तुझं तर लेका, तुझा कोटा तर कंप्लेट.
कशाचा कोटा कंप्लेट बाबा? २२ तारखेला रात्री ९ वाजता संपणारा जनता कर्फ्यू सोमवारी पहाटे पाचपर्यंत वाढविल्याचे समजले. म्हणून मग कर्फ्यू संपल्यावर बाहेर जाण्याचा केलेला प्लॅन  मी कॅन्सल करुन त्या रविवारी पहिली आणून ठेवलेली एक क्वार्टर संपवून टाकली.
मग अजून एक शिल्लक आहेच की तुझ्याकडे.
अरे बाबा एक शिल्लक आहे हीच तर खरी ट्रॅजेडी आहे.
एक शिल्लक आहे हीच ट्रॅजेडी? मी नाही समजलो.
अरे पंतप्रधानांनी २४ तारखेच्या मध्यरात्रीपासून २१ दिवसांसाठी संपूर्ण देशच लॉक डाऊन केल्याची घोषणा केली. आणि ही घोषणा होण्यापूर्वीच दोनपैकी एक क्वॉर्टर तर मी आधीच संपवली होती. आणि आता लॉक डाऊनमुळे कुठे मिळणंही मुश्कील आहे. आता जी एक शिल्लक आहे, त्यात मला पुढचे तीन रविवार कसे भागवायचे हा प्रश्न पडलाय. शेवटी सुरेशने त्याचा खरा प्रॉब्लेम क्लिअर केला.
हात्तीच्या एवढचं ना? दर रविवारी सिक्स्टिचा एक पेग प्रमाणे तीन रविवारमध्ये राहिलेली एक क्वॉर्टर संपवून टाक.  कशाला टेन्शन घेतोस? मी माझे गणितीय ज्ञान सार्थकी लाऊन त्याला सल्ला दिला.
अरे तुला इथे गंमत सुचायला लागलीय? पण २१ दिवसानंतर जर हे लॉक डाऊन संपलं नाही तर अजून किती दिवस मला आहे त्या एक क्वॉर्टरमध्ये  काढावे लागतील? पोलिओ डोसप्रमाणे एक एक ड्रॉप जिभेवर टाकून रविवार काढण्याच्या कल्पनेनेच माझं टेन्शन वाढायला लागलयं. आणि तुला मस्करी सुचायला लागलीयं.  जाऊ दे मी तुला फोन केला तेच चुकलं ठेवतो फोन मी.
आणि मी पुढे काही बोलायच्या आतच आमच्या चिंताग्रस्त मित्राने फोन कट केला सुध्दा.
l l l