आतल्या वर्तुळातून | आगळं! वेगळं !!!

आतल्या वर्तुळातून

"साहेब हा आमच्या पक्ष कार्यालयाच्या आत बाहेर संशयास्पदरित्या फिरताना आढळला म्हणून तुमच्याकडे आणलाय याला." दोन कार्यकर्ते एका भेदरलेल्या व्यक्तीला पोलिस स्टेशनमध्ये घेऊन आले होते.
इन्स्पेक्टर साहेबांनी त्याला अपादमस्तक न्याहाळले, आणि तो एक निरुपद्रवी सामान्य माणूस आहे, हे त्यांनी ताडले.
इन्स्पेक्टर : "काय रे, का फिरत होतास तू यांच्या कार्यालयात?"
सामान्य माणूस : "काही नाही साहेब, मी केवळ कुतूहलापोटी तेथे गेलो होतो."
इन्स्पेक्टर : "असं, कसलं कुतूहल?"
सामान्य माणूस : "साहेब, मी सामान्य माणूस आहे, दररोज पेपर वाचतो, त्यातील बातम्यात नेहमी उल्लेख केले जाणारे,'राजकीय वर्तुळ, आतले वर्तुळ, अधिकृत सूत्र, आतला गोट याच्याबद्दल मला कुतूहल आहे."
इन्स्पेक्टर :"बर मग काय करत होतास तू तिथे?"
सामान्य माणूस : "साहेब, मला पहायचं होतं की, हे राजकीय वर्तुळ कुठे आखलेलं असतं? त्याच्या आतील भागात असलेल्या त्या आतल्या वर्तुळातून बाहेरचं जग कसं दिसतं? अधिकृत सूत्र म्हणजे लहान दोरा असतो की मोठी दोरी? आणि आतला गोट म्हणजे कसा असतो? जाडजूड का कसा? कारण मला शिंपी लोक कपड्यांना गोट लावतात तेवढाच माहित आहे."
यावर इन्स्पेक्टर साहेब व त्या दोन कार्यकर्त्यांनी कपाळावर हात मारून घेतला नसता तरच नवल!

0 Comments:

Post a Comment