अॅन्ड्रॉईड फोनवरील इंटरनेट वापरात बचत शक्य
मर्यादित वापर करुनही अॅन्ड्रॉईड फोनवरील इंटरनेट पॅक लवकर संपतो अशी बऱ्याच जणांनी तक्रार असते. त्यात काही प्रमाणात तथ्यही आहे. कारण जेव्हा आपण फोन इंटरनेटला कनेक्ट करतो, तेव्हा फोनमधील बरीचशी अॅल्पीकेशन्स आपल्या नजरेस न येता, आपल्या अपरोक्ष इंटरनेटचा वापर करुन त्यांच्या साईटला कनेक्ट होत असतात. आणि त्यांच्याकडून होत असलेल्या डाटा ट्रान्स्फरमुळे आपल्या वापरापेक्षा अधिक लवकर डाटा पॅक संपण्याचा अनुभव येणे शक्य आहे. कोणत्या अॅप्लीकेशन्सने किती डाटा वापरला आहे हे माय डाटा मॅनेजर सारख्या अॅपच्या माध्यमातून स्पष्टपणे दिसून येईल.
कोणत्या अॅप्लीकेशन्सना डाटा वापरण्याची परवानगी द्यायची व कोणत्या अॅप्लीकेशन्सना नाकारायची यावर जर नियंत्रण ठेवता आले तर इंटरनेटच्या डाटा वापरात काही प्रमाणात बचत करता येऊ शकेल. आता हे नियंत्रण कसे ठेवायचे, तर आपल्या अॅन्ड्रॉईड फोनवर फायरवॉल अॅप्लीकेशन इन्टॉल करुन नियंत्रण ठेवता येईल. गुगल प्ले वर बरीचशी फायरवॉल अॅप्लीकेशन्स मोफत उपलब्ध आहेत. पण त्यापैकी बहुतेक रुट केलेल्या अॅन्ड्रॉईड फोनवरच चालू शकणारी आहेत. त्यामुळे ज्यांनी फोन रुट केलेला असेल, त्यांना ती उपयुक्त ठरतील.
पण ज्यांचा फोन रुट केलेला नसेल, त्यांच्यासाठी No Root Firewall नावाचे एक अॅप्लीकेशन आहे ते उपयोगी ठरेल. याचा वापर केल्यास इंटरनेट कनेक्ट झाल्याबरोबर कोणती अॅप्लीकेशन्स इंटरनेटला कनेक्ट होऊ पाहात आहेत, व त्यांना परवानगी द्यायची की नाही हे या फायरवॉलमुळे ठरवता येते. आणि त्यामुळे आपल्या अपरोक्ष, आपल्या परवानगीशिवाय होत असलेल्या अनावश्यक इंटरनेट डाटा वापरांवर नियंत्रण ठेवून बचत करणे शक्य होते.
विशेषतः जे लोक केवळ व्हॉटसअॅप, फेसबुकच्या वापराकरीताच असलेले इंटरनेट पॅक वापरत असतील त्यांना याचा विशेष फायदा होईल.