देशभरात मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी सुरु
लवकरच येणार, आता सुरु होणार असा गाजावाजा करणाऱ्या मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी सेवेला आज एकदाचा मुहूर्त लागला. काही ना काही तरी सबबी पुढे करून सतत वेगवेगळ्या तारखा जाहीर करण्यामुळे ही उशीरा सुरु झालेली सेवा सर्वाच्याच चर्चेचा विषय ठरली होती.
या सेवेमुळे आता केवळ सध्याचा क्रमांक बदलू नये म्हणून नाईलाजाने त्याच ऑपरेटरची सेवा वापरण्याचे दिवस गेले. मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी सेवेमुळे ग्राहकांना मोबाईल ऑपरेटर बदलण्याच्या अधिकार व संधी प्राप्त झाली आहे. आता ग्राहकांना त्यांचा सध्याचा असलेला क्रमांक कायम ठेवून हवा तो मोबाईल ऑपरेटर निवडण्याचे स्वातंत्र्य प्राप्त झाल्याने एक प्रकारे मोबाईल ऑपरेटर्सची एकाधिकारशाही व मनमानी समाप्त झाली असे म्हणायला हरकत नाही.
या सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना तश्या काही फार किचकट प्रक्रियेतून जावे लागणार नाही, ही एक या सेवेबाबत समाधानाची बाब म्हणावी लागेल. मात्र मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीच्या प्रक्रियेतील काही महत्त्वाचे मुद्दे आधी नीट समजून घेणे योग्य राहील.
पात्रता :
१. आधीची मोबाईल सेवा किमान तीन महिने (अॅक्टीव्हेट केलेल्या तारखेपासून ९० दिवस) वापरलेली असावी.
२. पोस्टपेड ग्राहकांनी त्यांची बिले पूर्णत: भरलेली असावी. पूर्वीची काहीही देणे बाकी नसावी.
३. ज्या क्षेत्रात पूर्वीची सेवा सुरु आहे त्याच सेवा क्षेत्रात मोबाईल ऑपरेटर बदलता येईल.
४. प्रिपेड ग्राहकांची शिल्लक असलेली टॉकटाईमची रक्कम पुढे वापरता येणार नाही ती पोर्टींगच्या वेळीच रद्द होईल.
पूर्तता :
१. पोर्ट करू इच्छित असलेल्या मोबाईल क्रमांकावरून PORT नंतर स्पेस नंतर तुमचा दहा अंकी मोबाईल क्रमांक उदा. PORT 9XXXXXXXXX असा एसएमएस 1900 या क्रमांकावर पाठवावा लागेल. त्यानंतर एक आठ अंकी पोर्टींग युनिक कोड नंबर तुम्हाला प्राप्त होईल.
२. नवीन ऑपरेटरच्या विक्रेत्याकडे CAF व Porting Form भरून त्यासोबत फोटो व आवश्यक पुराव्यांची कागदपत्रे द्यावे लागतील. पोस्टपेड ग्राहकांनी शेवटच्या भरलेल्या बिलाची प्रत सोबत जोडणे आवश्यक आहे. हे दोन्ही अर्ज व कागदपत्रे नवीन ऑपरेटरच्या विक्रेत्याकडे जमा करावे लागतील.
३. नवीन मोबाईल ऑपरेटरच्या विक्रेत्याकडून तुम्हाला एक नवीन सीमकार्ड मिळेल.
पोर्टींगची विनंती रद्द करता येईल :
तुम्ही केलेली पोर्टींगची विनंती, पोर्टींग नको वाटल्यास २४ तासांच्या आत तुम्हाला परत सुद्धा घेता येईल.
पोर्ट केलेल्या क्रमांकाचे अॅक्टीव्हेशन :
१. नवीन मोबाईल ऑपरेटरकडून पोर्टींगची तारीख व वेळ तुमच्या मोबाईलवर कळविली जाईल.
२. त्या तारीख व वेळेनंतर तुमचे जुने सिमकार्ड बदलून तुम्ही नवीन सिमकार्ड पूर्वीच्याच क्रमांकाने वापरू शकता.
पोर्टींगसाठी लागणारा कालावधी व पोर्टींग चार्ज :
१. पोर्टींग चार्ज रुपये १९/- पर्यंत राहील.
२. पोर्टींगसाठी ७ दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे, तर जम्मू काश्मीर, आसाम आणि उत्तर पूर्व सेवाक्षेत्रासाठी हा कालावधी १५ दिवस इतका लागू शकतो.
३. सेवा भंग कालावधी (पोर्टींग करत असताना खंडीत केलेल्या सेवेचा कालावधी म्हणजे या काळात मोबाईल सेवा पूर्णतः बंद केली जाईल) २ तासापेक्षा अधिक असणार नाही अगदी रात्रीच्यावेळी सुद्धा.
हे आहेत मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी संदर्भातील काही महत्त्वाचे मुद्दे, आता तुम्हाला पाहिजे तेव्हा पोर्टींग करता येईल.
Nice info :)
ReplyDelete्मी माझे बिल E.C. S.पेमेंट ने भरतो तर मग माझी लास्ट बिल भरल्याची पावती कशी सादत करु शकेन? बॅक अकौट मधुन माझे बील प्रत्यक महीन्याला वजा केले जाते.
ReplyDeleteयासाठी आपणाला संबंधित विक्रेत्याशी संपर्क साधावा लागेल.
ReplyDelete