अंनिसने यांनाही आव्हान द्यावे | आगळं! वेगळं !!!

अंनिसने यांनाही आव्हान द्यावेअंनिसने यांनाही आव्हान द्यावे
लोकसभा निवडणूक 2014 च्या पार्श्वभूमीवर काही ज्योतिष्य तज्ञांनी, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत असे भाकित केले आहे. त्यामुळे ज्योतिष्यशास्त्राने केलेला हा दावा सध्या चर्चेत आहे. अशातच अंधश्रध्दा निर्मूलन समितीने म्हणजेच अंनिसने ज्योतिष्यशास्त्राला निवडणूकांच्या निकालांचे अंदाज अचूक सांगण्याचे आव्हान दिलेले आहे.
ज्या ज्या वेळी सार्वत्रिक निवडणूका येतात त्या त्या वेळी, निवडणूकांच्या तोंडावर अश्या चर्चा नेहमीच घडत असतात. निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर फक्त ज्योतिषीच भविष्य वर्तवून दावा करतात असे नाही, तर प्रिंट मिडिया व इलेक्ट्रॉनिक मिडीया म्हणजेच विविध वर्तमानपत्रे आणि विविध दूरचित्रवाहिन्यासुध्दा वेगवेगळया सर्वेक्षण करणाऱ्या संस्थांच्या सहकार्याने सर्व्हे करुन, त्यांचे रिपोर्टस आपल्या वाहिन्यांवर, वर्तमानपत्रातून प्रसिध्द करुन आपली लोकप्रियता वाढविण्याचा प्रयत्न करत असतात हेही सर्वश्रुत आहेच.
बरे केवळ माध्यमेच दावा करतात असेही नाही, तर विविध राजकीय पक्षांचे नेते, प्रवक्ते सुध्दा आपापल्या पक्षाला इतक्या जागा मिळतील, तर विरोधी पक्षाला तितक्या जागा मिळतील असे दावे छातीठोकपणे करताना दिसत असतात. सर्व्हे करणाऱ्या संस्थांचे रिपोर्टस शास्त्रीय पध्दतीवर आधारित असल्याचा दावा केला जातो. तर सत्ताधारी राजकीय पक्षांच्या दाव्यांना सरकारी गुप्तचर यंत्रणांच्या अवहलांचे पाठबळ असते ही बाब नाकारुन चालणार नाही.
काही महिन्यापूर्वीच पार पडलेल्या देशातील पाच विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर विविध चॅनेल्सवर व वर्तमानपत्रातून प्रसिध्द झालेल्या जवळपास सगळ्याच सर्व्हेंचे रिपोर्टस विशेषतः दिल्ली विधानसभेबाबतचे बऱ्याच प्रमाणात चुकीचे ठरले हे देशातील जनतेने अनुभवले आहे. नाही म्हणायला याला केवळ चाणक्य टुडे ही एकमेव सर्वेक्षण संस्था अपवाद ठरली. मग असे असताना सर्वसामान्य जनतेने विश्वास कोणावर ठेवायचा हा प्रश्न निर्माण होतो.
प्रत्यक्ष जनतेतील काही लोकांना प्रश्न विचारून, शास्त्रीय पध्दतीचा अवलंब करुन केलेले सर्वेक्षण संस्थांचे सर्व्हे जर चुकीचे ठरत असतील, गुप्तचर यंत्रणांनी संकलित केलेल्या माहितीच्या आधारे सत्ताधारी पक्षांनी केलेले दावे चुकीचे ठरत असतील, तर अंनिसने फक्त ज्योतिष्यशास्त्राकडूनच अचूक अंदाजांची अपेक्षा का ठेवावी?
त्यामुळे अंनिस केवळ ज्योतिष्य शास्त्रालाच, त्यांनी केलेले दावे असत्य व चुकीचे आहेत असे मानून का आव्हान देत आहे असा प्रश्न पडतो. अंनिसने निवडणूकांच्या अंदाजाबाबत केवळ ज्योतिष्यशास्त्रालाच आव्हान देण्याऐवजी, त्यांनी त्यांच्या आव्हानाची कक्षा अधिक रुंद करावी, व वर उल्लेख केल्याप्रमाणे विविध सर्व्हे करणाऱ्या संस्था, त्यांना प्रसिध्दी देणारी प्रिंट मिडीया व इलेक्ट्रॉनिक मिडीया, विविध पक्षांचे प्रमुख, प्रवक्ते असे जे पण कोणी निवडणूकीच्या निकालाबाबतचे दावे करत आहेत, त्या सर्वांनाच त्यांनी केलेले दावे सिध्द करण्याचे आव्हान द्यावे.

* * *

4 Comments:

 1. व्वा! काय संधी साधली आहे!! अंनिसला बदनाम करण्याची एकही संधी सोडत जाऊ नका. अंनिसच्या वतीने मी उत्तर देतो. फक्त ही कमेंट डिलीट करू नका म्हणजे झाले.
  ज्योतिषी फक्त निवडणुकीची भाकिते वर्तवत असते तर अंनिसला काहीच देणे-घेणे नव्हते हो. पण ते तर सामान्य जनतेच्या रोजच्या जगण्यात नाक खुपसत असतात. भूलथापा देऊन पैसे उकलत असतात. उदा. अमक्या मुलीला सून म्हणून स्वीकारू नका. तिची रास वृश्चिक आहे. या राशीच्या मुली भांडखोर असतात. आणि लोक त्यांचा सल्ला मानतात. विनाकारण ती मुलगी बदनाम होऊन बसते. फलज्योतिषावर लोकांचा बराच विश्वास असतो. पण फलज्योतिष हे असा विश्वास ठेवायच्या लायकीचे शास्त्र नाही. आणि ते पटवून देण्याची नामी संधी म्हणजे निवडणुका. ज्योतिषी अंनिस चे आव्हान स्वीकारत नाहीत याचा अर्थच असा होतो की त्यांचे शास्त्र नकली आहे. हे लोकांना समजून यावे म्हणून हे आव्हान आहे. आता इतर सर्वेक्षण करणाऱ्या संस्था लोकांकडून पैसे घेऊन त्यांच्या दैनंदिन जीवनातील प्रश्नांमध्ये नाक खुपसत नाहीत ना. आणि आमच्या प्राचीन वारशाचा दावा पण करत नाहीत ते.

  ReplyDelete
  Replies
  1. व्वा! काय संधी साधली आहे!! अंनिसला बदनाम करण्याची एकही संधी सोडत जाऊ नका.
   अंनिसने ज्योतिष्यासोबतच दावे करणाऱ्या इतरांनाही आव्हान द्यावे असे म्हणणे म्हणजे बदनामी? - बदनामीची एक नविन व्याख्या
   माझ्या आठवणीनुसार मी अंनिसबाबत आजपर्यंत लिहलेला हा पहिलाच लेख. एकही संधी सोडत जाऊ नका म्हणजे मग ही माझी कितवी संधी? असा आरोप करण्यापूर्वी आख्ख्या आंतरजालावर मी कुठे अंनिसच्या नावाने काही लिहलेले आढळते का याबद्दल उत्खनन केले असते बरे झाले असते, आणि मी कितवी संधी साधली हेही समजले असते.
   कोण कुणाच्या जीवनात नाक खुपसतो याचा येथे काहीच संबंध नाही. मुळात तो लेखाचा विषयच नाही.
   फलज्योतिष्य विश्वास ठेवायच्या लायकीचे शास्त्र नाही.
   मी तुम्हाला कुठे विश्वास ठेवायला सांगितलाय?
   शेवटी लेखाचा मुद्दा थोडक्यात सुस्पष्टपणे एवढाच आहे की,या लेखाला फक्त निवडणूकीची पार्श्वभूमी आहे, आणि लोकसभा निवडणूका 2014 च्या पार्श्वभूमीवर निकालाबाबतचे दावे करणारे ज्योतिष्याव्यतिरिक्त आणखीही काही व्यक्ति, संस्था या मैदानात आहेत, त्यांनाही आव्हान द्यावे इतकेच मत व्यक्त केले आहे.
   ज्योतिष्यशास्त्र खरे आहे त्यामुळे ज्योतिष्यांना आव्हान देऊ नये असे यांत कुठेही म्हटलेले नाही. किंवा ज्योतिषी आव्हान का स्विकारत नाहीत हे घ्या त्याचे समर्थन असेही या लेखात लिहलेले नाही. सर्वेक्षण करणाऱ्या संस्था आणि ज्योतिषी पैसे घेऊन नाक खुपसतात की नाही याचा येथे काहीच संबध नाही. तर निकालाबाबत दावे करणारे जे कोणी सगळे या मैदानात आहेत मग ते पैसे घेऊन असोत किंवा प्रसिध्दीसाठी असोत त्या सगळ्यांनाच आव्हान द्यावे इतकाच मुद्दा आहे.
   त्याला संधी साधणे आणि बदनामी करणे म्हणणे म्हणजे लेखाचा विषय न समजल्याचे लक्षण आहे.

   Delete
 2. १) प्रथमतः अंनिस ची बदनामी केली असे म्हटल्याबद्दल माफी मागतो. मला तिथे ‘बदनामी’ हा शब्द अपेक्षित नव्हता. अंनिसवर टीका करण्याची किंवा अंनिसला टार्गेट करण्याची एकही संधी सोडत जाऊ नका असे म्हणायचे होते. परंतु लिहिताना हवा तो शब्द न सुचल्यामुळे चुकीचा शब्द लिहिला गेला. अंनिसला बदनाम करण्याचे प्रयत्न सतत होत असतात. परंतु आपल्या लेखाचा तो हेतू दिसत नाही. क्षमस्व.
  २) आपण अंनिसला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे असे म्हणण्याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे निवडणुकीच्या निमित्ताने तसा प्रयत्न झाला आहे. बेळगाव ‘तरुण भारत’ (दि.१२ मार्च) मध्ये एक पत्र प्रसिद्द झाले होते. त्यामध्ये पत्रलेखकाने फलज्योतिषाची पाठराखण करून अंनिसवर तोंडसुख घेतले होते. (http://epaper.tarunbharat.com/241674/Tarun-Bharat-Sangli/san#page/4/2 व http://epaper.tarunbharat.com/247995/Tarun-Bharat-Sangli/san#page/4/2) दाभोलकरांची कुंडली ज्योतिषांना दाखवा म्हटले होते. आणि निवडणूक सर्वे करणाऱ्या संस्था/संघटनांना का आव्हान देत नाही असा जाब विचारला होता. आणि तुमचाही नेमका तोच प्रश्न आहे. त्यामुळे तुम्हीही त्या लोकांपैकीच एक वाटलात. तुम्ही तसे नसावेत अशी अपेक्षा करतो. दुसरे कारण म्हणजे आपल्या लेखातील या ओळी ‘...तर अंनिसने फक्त ज्योतिष्यशास्त्राकडूनच अचूक अंदाजांची अपेक्षा का ठेवावी?
  त्यामुळे अंनिस केवळ ज्योतिष्य शास्त्रालाच, त्यांनी केलेले दावे असत्य व चुकीचे आहेत असे मानून का आव्हान देत आहे असा प्रश्न पडतो. अंनिसने निवडणूकांच्या अंदाजाबाबत केवळ ज्योतिष्यशास्त्रालाच आव्हान देण्याऐवजी, त्यांनी त्यांच्या आव्हानाची कक्षा अधिक रुंद करावी, व वर उल्लेख केल्याप्रमाणे विविध सर्व्हे करणाऱ्या संस्था, त्यांना प्रसिध्दी देणारी प्रिंट मिडीया व इलेक्ट्रॉनिक मिडीया, विविध पक्षांचे प्रमुख, प्रवक्ते असे जे पण कोणी निवडणूकीच्या निकालाबाबतचे दावे करत आहेत, त्या सर्वांनाच त्यांनी केलेले दावे सिध्द करण्याचे आव्हान द्यावे’
  या ओळींमुळे अंनिसबाबत गैरसमज होण्याची शक्यता नाही का? लोकांना अंनिसच्या हेतूबद्दल शंका येण्याची शक्यता नाही का? आणि अशी शंका घेतली गेली तर ती अंनिसची बदनामी नाही का?
  ३) तुम्ही याआधी अंनिसवर टीका केली नसेल. तुम्ही ही पहिलीच संधी घेतली असेल. पण माझे म्हणणे वैयक्तिक तुमच्यासाठी नव्हते. कारण असा प्रयत्न वारंवार होतो. त्यासाठी काहीही खोट्यानाट्या गोष्टी सांगितल्या जातात. नसते मुद्दे उकरून काढले जातात. अशा लोकांसाठी हे म्हणणे होते.
  ४) या निमित्ताने फलज्योतिषाच्या खरे-खोटेपणाची चर्चा व्हावी हाही माझ्या प्रतिक्रियेचा हेतू होता.

  ReplyDelete
  Replies
  1. 1) तुमची चूक तुमच्याच लक्षात आल्याची कबूली दिलीत धन्यवाद !
   अंनिसला टार्गेट करण्याची एकही संधी सोडत जाऊ नका असे म्हणायचे होते.
   --> तुम्ही जर अंनिसचे अधिकृत प्रवक्ते असताल तर, अंनिसबाबत कुणीही कुठेही काहीच लिहू नये, आणि लिहल्यास तो संधीसाधू ठरेल अशी भूमिका जाहिर करुन टाका. आणि अधिकृत प्रवक्ते नसताल तर, अंनिसच्या नावाने प्रतिक्रिया लिहण्यापूर्वी विचार करून लिहा, की ज्यामुळे अंनिसच्या भूमिकेबाबत लोकांचे गैरसमज होणार नाहीत.
   2) आपण अंनिसला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे असे म्हणण्याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे निवडणुकीच्या निमित्ताने तसा प्रयत्न झाला आहे. आणि पत्रलेखकाने निवडणूक सर्वे करणाऱ्या संस्था/संघटनांना का आव्हान देत नाही असा जाब विचारला होता.
   --> मी काय किंवा आणखी कुणी काय, हा मुद्दा कुणीच उपस्थित करु नये काय? असा मुद्दा उपस्थित करणारांना लगेचच अंनिसवर टीका करणारे ,अंनिसला टार्गेट करणारे, आणि अंनिसचे विरोधक ठरविणारे तुम्ही कोण? अंनिसची एखादी भूमिका जर कुणाला चुकीची वाटली, तर त्यांनी त्याविरोधात काहीच बोलायचे नाही का?
   जे पण कोणी निवडणूकीच्या निकालाबाबतचे दावे करत आहेत, त्या सर्वांनाच त्यांनी केलेले दावे सिध्द करण्याचे आव्हान द्यावे. या ओळींमुळे अंनिसबाबत गैरसमज होण्याची शक्यता नाही का? लोकांना अंनिसच्या हेतूबद्दल शंका येण्याची शक्यता नाही का? आणि अशी शंका घेतली गेली तर ती अंनिसची बदनामी नाही का?
   --> याओळीमुळे अंनिसबाबत लोकांचा प्रथम गैरसमज होणार, मग अंनिसच्या हेतूबद्दल शंका घेतली जाणार आणि एकदा का अशी शंका लोकांना आली की, ती अंनिसची बदनामी होणार. भलतेच अजब तर्कशास्त्र आहे.
   3) तुम्ही याआधी अंनिसवर टीका केली नसेल. तुम्ही ही पहिलीच संधी घेतली असेल.
   --> पुन्हा तेच. अंनिसबाबत काहीही लिहणं म्हणजे संधी साधणं. संधीसाधूपणा बाबत वर मुद्दा क्र. 1 मध्ये मत मांडले आहे ते वाचावे.
   त्यासाठी काहीही खोट्यानाट्या गोष्टी सांगितल्या जातात. नसते मुद्दे उकरून काढले जातात. अशा लोकांसाठी हे म्हणणे होते.
   -->अशां लोकांसाठी हे म्हणणे होते तर मग येथे मांडायचे कारण काय?
   4) या निमित्ताने फलज्योतिषाच्या खरे-खोटेपणाची चर्चा व्हावी हाही माझ्या प्रतिक्रियेचा हेतू होता.
   --> हा लेख फलज्योतिष्याच्या खरेखोटपणाची चर्चा करण्यासाठी लिहलेला नाही. याचाच अर्थ हा नसता मुद्दा चर्चेसाठी उकरुन काढण्याचा प्रयत्न आहे. पण खेदाने सांगावेसे वाटते, तुमची जागा चुकली आहे. प्रतिक्रिया देण्यापूर्वी लेख नीट वाचणे गरजेचे आहे. एवढी तर्कहीन प्रतिक्रिया देऊन तुम्हाला काय साध्य झाले ते तुम्हालाच ठाऊक.

   Delete