ई-साहित्य प्रतिष्ठान : एक चळवळ | आगळं! वेगळं !!!

ई-साहित्य प्रतिष्ठान : एक चळवळ



ई-साहित्य प्रतिष्ठान : एक चळवळ

मराठी भाषेतील साहित्यासाठी काही तरी केले पाहिजे या एका विचाराने झपाटलेली, आणि मराठी साहित्यावर प्रेम करणारी काही मंडळी सुमारे पाच वर्षापूर्वी एकत्र आली. मग सुरु झाले विचारमंथन, विचारांना दिशा मिळाली आणि त्यातूनच जन्म झाला एका चळवळीचा. आणि बघता बघता काही कालावधीतच त्या चळवळीने एका साहित्य यज्ञाचे स्वरुप धारण केले, त्या यज्ञाचं, त्या चळवळीचं नांव आहे ई-साहित्य प्रतिष्ठान.
छापील साहित्याच्या तुलनेत ई-साहित्य निर्मितीला येणारा अल्प खर्च, अनंतकाळचा टिकाऊपणा, वितरणासाठीचा अल्प खर्च, हव्या तश्या बहुरंगी सजावटीमुळे अधिक आकर्षकपणा आणि कमीत कमी वेळेत निर्मिती, याचसोबत कागद व शाईचा वापर नसल्यामुळे पर्यावरणचा समतोल राखण्यास अनुकूल अशी ई-साहित्य माध्यमाची जबरदस्त ताकद लक्षात घेऊन त्यांनी हेच माध्यम निवडले.
आणि या मंडळींनी ई-साहित्याच्या सेवेत स्वतःला झोकून दिले. अगदी निस्वार्थीपणे. यातून स्वतःला काही प्राप्ती व्हावी हा उद्देश तर अजिबातच नाही, तर मराठी साहित्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या जगभरात विखुरलेल्या साहित्यप्रेमींना आपल्या माध्यमातून काही तरी चांगले साहित्य प्राप्त व्हावे. नवोदितांना प्रकाशन, वितरणांसाठी व्यासपीठ मिळावे, हाच या चळवळीच्या मागे उभा असलेला आणि या कार्यासाठी त्यांना निरंतर प्रेरणा देत रहाणारा उदात्त विचार.
नवोदित साहित्यीकांना प्रोत्साहन देऊन, त्यांचे साहित्य प्रकाशित करणे ते वितरीत करणे, नियतकालिके चालविणे, तसेच त्यांच्या संकेतस्थळांवर हे सर्व साहित्य सर्व मराठी साहित्यप्रेमी वाचकांना उपलब्ध करुन देणे यासारख्या कार्यातून ही चळवळ आज प्रगती करत आहे.
त्यांच्या ई-साहित्य प्रतिष्ठान या संकेतस्थळांवर त्यांनी आजवर प्रकाशित केलेली अडीचशेहून अधिक विविध विषयांवरील ई-पुस्तके, नियतकालिके असे सर्व ई-साहित्य डाऊनलोड करुन घेण्यासाठी सर्वांना उपलब्ध आहेत. आणि तेही अगदी विनामूल्य. साहित्य आणि वाचक यांच्यात कोणत्याही जाहिरांतींचासुध्दा अडथळा नाही, असा पारदर्शकपणा या संकेतस्थळावर पहायला मिळतो.
www.esahity.com

वितरणांसाठी आज या ई-साहित्य प्रतिष्ठानकडे सुमारे दीड लाख वाचकांचा ई-मेल आयडींचा डाटाबेस तयार आहे. आणि सर्व ई-साहित्य या लाखो वाचकांपर्यंत ई-मेलच्या माध्यमातून अतिशय जलदगतीने पोहोचविले जाते.
तेव्हा या चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी, आणि चांगले साहित्य वाचायला मिळण्यासाठी आपण सर्वांनी त्यांच्या संकेतस्थळाला एकदा भेट देऊन एक प्रसन्न अनुभव जरुर घ्यावा. येणारे नविन साहित्य मिळण्यासाठी आपला ई-मेल आयडी देऊन सभासद म्हणून नोंदणी करावी. 
बारा कोटी मराठी माणसांपैकी निदान एक टक्का म्हणजे किमान बारा लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प उरी बाळगून ई-साहित्य प्रतिष्ठान उत्तुंग झेप घेण्यासाठी सज्ज आहे. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकून, त्यांच्या संकल्पाच्या पंखात बळ भरण्यासाठी, प्रत्येक मराठी वाचक सभासद नोंदणीच्या रुपाने आपले योगदान नक्कीच देतील अशी अपेक्षा आहे.

* * *

0 Comments:

Post a Comment