मानसिक तणावातून 'मुक्ती'ची 'युक्ती' | आगळं! वेगळं !!!

मानसिक तणावातून 'मुक्ती'ची 'युक्ती'

सध्याच्या युगात प्रत्येक व्यक्ती मानसिक ताणतणावाला सामोरी जात आहे. आणि या मानसिक ताणतणावामुळे उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा व्याधींना बळी पडण्याची वेळ अनेकावर येत आहे.

या मानसिक ताणतणावावर मात करण्याची एक सोपी युक्ती की जी मी स्वतःच शोधली आहे, व काही टिप्स येथे दिल्या आहेत.एक अत्यंत साधी व सोपी युक्ती

एक साधे उदाहरण पहा की, आपण जेव्हा बाहेरून घरी परत येतो, तेव्हा पायातील जोडे घराच्या बाहेरच्या कोपर्‍यातच काढून ठेवतो. बाहेरून आल्यावर आपल्या अंगात असलेले कपडे बदलून घरात वापरण्याचे कपडे घालतो. या रोजच होत असलेल्या सहज कृतीने घरात आपल्याला अगदी मोकळं वाटतं, म्हणजेच आपण रिलॅक्स होतो.

आणि नेमकी हीच गोष्ट आपण आपल्या विचारांना लागू करायची आहे. हीच आहे ती सोपी युक्ती. पायातल्या जोडयाप्रमाणे आणि अंगातल्या कपडयाप्रमाणेच, घरात प्रवेश करतेवेळीच ऑफिसमधील किंवा व्यापारामधील विचारसुद्धा घराबाहेरच सोडायचे. घरात आल्यानंतर फक्त आपल्या कुटुंबाचाच विचार करायचा. बाहेरील विचार घराबाहेरच ठेवायचे.

आणि याच्याविरूद्ध घरातून बाहेर पडल्यानंतर ऑफिसमध्ये किंवा दुकानामध्ये फक्त आपल्या दैनंदिन कामकाजाचेच विचार मनात आणायचे. तेथे घरातील विचार अजिबात मनात आणायचे नाहीत.

या सोप्या युक्तीने, घरातील व बाहेरील विचारांची होणारी गल्लत टाळल्यास मानसिक तणावातून मुक्ती मिळण्यास निश्चितच मदत होते यात शंकाच नाही.

या सोप्या युक्तीसोबतच आणखी काही उपयुक्त टिप्सही अंमलात आणण्याचा प्रयत्न अवश्य करा.

चिडचिड टाळा

चिडचिड करण्यामुळे मनावर ताण वाढतो, हे तर सर्वानांच माहित असतं. तरीही चिडचिड चालूच असते. एखादे काम नाईलाजाने करावे लागले तर चिडण्यापेक्षा, हे काम माझ्यामुळेच तर झालं अशी फुशारकी मारून आपण केलेल्या कामाचा आनंद लुटण्याचा प्रयत्न करा. अशाप्रकारे होणारी चिडचिड टाळण्याचा प्रयत्न करून पहायला काय हरकत आहे?

मनाला छंद लावा

रिकाम्या डोक्यात नेमके नको ते विचार येऊन, टेन्शन वाढते. तेव्हा मनाला आपल्या आवडीच्या छंदात गुंतवा. लिहणे, वाचणे, संगीत ऐकणे, आवडते चित्रपट पहाणे, चित्रकला, फोटोग्राफी, कलात्मक वस्तूनिर्मिती, फिरायला जाणे, बागकाम अश्या कित्येक गोष्टी आहेत की, ज्यामुळे आपल्या मनाला आनंद मिळतो व मानसिक समाधानही लाभते. तर असे कोणतेही छंद मनाला लावून द्या, म्हणजे ते लहान मुलाप्रमाणे त्यात रमेल व त्यामुळे इतर विचारांना मनात यायला वाव मिळणार नाही.

स्वानुभव

या बाबतीतील माझा स्वत:चा अनुभव असा की, मला कॉम्पुटर व इंटरनेटची आवड असल्यामुळे मी इंटरनेटच्या माध्यमातून ब्लॉगिंग करायला शिकलो आणि इंटरनेटमुळे आता रोज काहीतरी नविन शिकायला मिळते. त्यामुळे या मनाला आनंद देणाऱ्या छंदात मन रमत असल्यामुळे आणि वर उल्लेख केलेली सोपी युक्ती की जी मी स्वतःच शोधली आहे, ती वापरत असल्यामुळे मी मानसिक तणावापासून जास्तीतजास्त लांब आहे हे आपणास सांगायला मला आनंद वाटतो.

तुम्हीही याचा उपयोग करा आणि आपलेही अनुभव मला अवश्य कळवा.

0 Comments:

Post a Comment