अखेर अजितदादा पवारच जिंकले | आगळं! वेगळं !!!

अखेर अजितदादा पवारच जिंकले

नांदेड येथील सभेतून अजितदादा विरुद्ध पत्रकार अश्या सरू झालेल्या वादावर, पुतण्याच्या वतीने काका शरद पवार यांनी व्यक्त केलेल्या दिलगिरीनंतर पडदा पडला. या रंगलेल्या नाट्याला उभ्या महाराष्ट्राची जनता साक्ष आहे. हा प्रश्न दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेचा केला होता, मात्र यात सरशी दादांचीच झाली आहे हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे.

आणि हे नाकबूल असणारांनी, हा वाद 'मोठ्या साहेबाविरूध्द' होता का?, पत्रकारांना माफीची अपेक्षा कुणाकडून होती? या प्रश्नाची उत्तरे शोधावीत.

सुमारे आठवडा ऊलटूनही दादांनी तर पत्रकारांना हिंग लावूनही (आजपर्यंतही) विचारले नाही. याची बोच पत्रकारांच्या मनात सलत होतीच. जी कृती पत्रकारांनी करायची होती ती केली दादांनीच, त्यांनी पत्रकारांना अनुल्लेखाने मारले.

या प्रकरणामुळे आणखी एक सिद्ध झाले की, अजित पवार यांच्यावर दबाव आणण्याबाबत काकापासून मुख्यमंत्र्यापर्यंत सर्वांच्याच मर्यादा स्पष्ट झाल्या. या प्रकरणाची कोंडी फुटण्याची चिन्हे दिसत नसतानाच, इलेक्ट्रॉनिक मिडीयाने विजय मिळाल्याच्या आविर्भावात 'शरद पवार' यांनी दिलगिरी व्यक्त केल्याची ब्रेकिंग न्यूज द्यायला सुरुवात केली. त्यात मोठ्या साहेबांचा 'आदर' ठेवून हा वाद संपवीत असल्याचे कारण द्यायलाही ते विसरले नाहीत.

आता येथे प्रश्न हा निर्माण होतो की, जर मोठ्या साहेबांचा आदर ठेवायचा होता, आणि त्यांच्या दिलगीरीवर समाधान होणार होते तर, हा वाद झाल्याबरोबर पत्रकारांनी त्वरित शरद पवारांशी संपर्क साधून हा वाद त्वरित संपवायला हवा होता. मग त्यांनी तसे का केले नाही? 

मुळातच पत्रकारांना ते अपेक्षितच नव्हते, पण काहीच हाताला लागेना तेव्हा बुडत्याला काडीचा आधार या न्यायाने मनाचा 'मोठेपणा' दाखवून या प्रकरणावर पडदा टाकण्यात येत असल्याचे जाहीर केले गेले.

आता सर्वात महत्वाचा आणि डोळेझाक केला गेलेला मुद्दा : पत्रकाराविरुद्ध झालेल्या अन्यायाविरुद्ध गळा काढला गेला, पण ज्या पत्रकाराने प्रत्यक्ष हा अन्याय भोगला, ज्याला पोलिसांनी धक्काबुक्की करून बाहेर काढले, ज्याला हा अपमान सोसावा लागला , त्या पत्रकाराला मात्र इतर सगळेच पत्रकार विसरलेले दिसतात. 

विविध वाहिन्यांवर दाखविलेल्या फुटेजमध्ये फक्त एकाच पत्रकाराला किंवा कॅमेरामनला तो जो कुणी असेल तो, त्याला पोलिसांनी व कमांडोजनी सभास्थळापासून बाहेर नेल्याचे दिसते. तो कोण आहे? त्याचे नाव काय आहे? त्याला एकट्यालाच पोलिसांनी जबरदस्तीने का बाहेर काढले? त्याचा अपराध काय होता? पोलिसांना याविषयीचे आदेश कुणी दिले? असे करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे काय आहेत? त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी पत्रकार मंडळींनी काय पाठपुरावा केला? आता ते प्रयत्न सोडून दिले आहेत का? या प्रश्नांची उत्तरे शोधून आपापल्या वाहिन्यावर दाखविण्याच्या भानगडीत मिडीयावाले पडलेले दिसत नाहीत. इतरांच्या पार खाजगी आयुष्यात डोकावणारे मिडीयावाले आपल्याच व्यवसायबंधुवरील अन्यायाला वाचा फोडण्यात मागे का रहात आहेत हे अनाकलनीय आहे.

कांद्याचे भाव वाढले तरी मीच आणि कमी झाले तरी जबाबदार मीच असे दाखविणाऱ्या पत्रकारापासून चार हात लांब राहिलेलेच बरे अशा शब्दात काकांनी आणि पुन्हापुन्हा तेच पूराचे पाणी दाखवितात अशा शब्दात पुतण्यांनी आपापली नाराजी व्यक्त केली आहे. राजकारण्यांच्या या नाराजीमागील भावनाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. त्यांच्या चुका होतात त्याचप्रमाणे आपणाकडूनही होत असलेल्या चुका मिडीयाने विशेषतः इलेक्ट्रॉनिक मिडीयाने तपासून पाहण्याची गरज आहे.

याच निमित्ताने बहिष्काराचे शस्त्र वापरण्याबाबत पत्रकारात असलेले मतभेदही लपून राहिले नाहीत. या अस्त्राचा वापर किती प्रभावी आहे आणि त्याचा वापर करावा किंवा नाही याचा विचार त्यांना करावा लागेल.

या वादात अजितदादांची जीत झाली आहे, यात वाद नाही. पण त्यांनीही आपल्या राजकीय जीवनात यापुढे असे घडू नये याची पुरेपुर दक्षता घेणे तितकेच गरजेचे आहे. 

शेवटी काय की राजकारणी नेते आणि प्रसारमाध्यमे या दोघानांही असे वाद होणे एकमेकांना परवडणार नाही याची जाणीव ठेवावी लागेल.

1 Comments: