आता कुठे आहेत युवराज? | आगळं! वेगळं !!!

आता कुठे आहेत युवराज?

मंगळवार दि.९ ऑगस्ट २०११ रोजी म्हणजेच क्रांतीदिनी मावळ भागातील जलवाहिनीवरून एक्सप्रेस हायवेवर झालेल्या आंदोलनात पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार करत तीन आंदोलकांना टिपले. क्रांतिदिनाचे हे दुर्दैव म्हणायचे. या ठार झालेल्या आंदोलकांना सर्वप्रथम श्रध्दांजली!


वृत्तवाहिन्यांनी दाखविलेल्या वेगवेगळ्या दृष्यावरून आंदोलकांनी व्हॅनमध्ये पोलीस बसलेले असताना दगडफेक केली, पोलीस गाड्या उलथून टाकल्या, त्या पेटवून दिल्या. असे दृश्य आपणाला दिसले. त्यानंतर पळणाऱ्या आंदोलकावर पोलिसांनी पाठीमागून गोळ्या झाडल्याची दृश्येही आपण पाहिली. तसेच अक्षरशः पिसाळलल्याप्रमाणे पोलिसांनी काही गाड्या फोडल्या, आत बसलेल्यांना घेरून काठ्यांनी झोडपले अशी दृश्येही आपल्याला बघायला मिळाली. असे उघडेनागडे सत्य आपणासमोर आले आहे, मात्र ते तुकड्यातुकड्यांनी. त्याचा सिक्वेन्स अजून लागलेला नाही.

आता उभी रहाते ती लांबलचक प्रश्नमालिका. शांततेने आंदोलन करणारे आंदोलक अचानक संतप्त का झाले? त्यांचा उद्रेक उत्स्फूर्त होता की त्यांना तसे करण्यास कुणी प्रोत्साहित केले? संतप्त जमावाची मानसिकता लक्षात घेऊन जमाव हाताळण्यात पोलीस का अपयशी ठरले? पोलिसांनी गाड्या का फोडल्या? पळणाऱ्या आंदोलकावर पोलिसांनी पाठीमागून का गोळ्या झाडल्या? या व इतर प्रश्नांची उत्तरे चौकशीअंती समोर येतीलच, पण आज तरी प्रथमदर्शनी पोलिसांनी अतिरेक केला अशीच भावना सर्वसामान्यांच्या मनात आहे.

कोणत्याही घटनेचे राजकीय भांडवल करण्याची परंपरा याहीवेळी सर्वानीच सुरु ठेवल्याचे दिसते. याआधी या मावळच्या पाणी प्रश्नाविषयी कुणी आवाज उठविल्याचे आठवत नाही. तापल्या तव्यावर पोळ्या भाजून घ्यायला मात्र सगळेच पुढे सरसावताना दिसतात. आणि पोलिसांच्या प्रत्येक कृतीचे समर्थन करणे हीच आपली जबाबदारी असल्याच्या समज गृहमंत्री आर. आर. आबांनी करून घेतला आहे की काय अशी शंका येते. दोन्ही गोष्टी चीड आणणाऱ्या आहेत.

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय सहन न होणारे आणि शेतकऱ्यांचे (बहुदा भारतातील 'एकमेव') कैवारी कॉंग्रेसचे युवराज राहुल गांधी आणि त्यांना सांभाळण्यासाठी ठेवलेला बाब्या दिग्विजयसिंह अजूनही इकडे पोहोचल्याचे दिसत नाही. कोंग्रेसची सत्ता असलेल्या राज्यात शेतकऱ्यांना टिपून मारण्यात आल्याचे दुःख युवराजांना झाले नाही का? सतत युवराजांची चापलूसी करणाऱ्या लाळघोट्या कोंग्रेसजणांना हा पक्षपात दिसत नाही का? महाराष्ट्र सरकार बरखास्त करण्याची मागणी करण्याची हिंमत युवराज दाखवतील का? दिग्गीराजांचे तोंड या विषयावर का बंद आहे? त्यांना यात अजून आरएसएसचा हात कसा दिसला नाही याचेच नवल वाटते.

0 Comments:

Post a Comment