राहुल गांधींची स्टंटबाजी | आगळं! वेगळं !!!

राहुल गांधींची स्टंटबाजी

राहुल गांधींना उत्तर प्रदेशात अटक म्हणजे, राजकुमार आता प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी कशी करायची याचे प्रॅक्टीकली धडे गिरवीत आहेत याचे एक उत्तम उदाहरण आहे. तसे पाहायला गेले तर राजकुमारांना आणि त्यांच्यासोबत असलेले त्यांचे राजकीय गुरु दिग्विजयसिंह आणि रीटा बहुगुणा, राजबब्बर या हाय प्रोफाइल राजकीय नेते मंडळीना प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या समस्येबाबत किती कळवळा आहे? मनापासून किती आस्था आहे? हा संशोधनाचा विषय ठरेल. केवळ आगामी निवडणुका डोळयासमोर ठेवून केलेला हा स्टंट आहे हे स्पष्ट आहे.


मागे मुंबई दौऱ्याचा वेळी त्यांनी असाच लोकल प्रवासाचा स्टंट केला होता. मुंबईत लोकलमधून फुल्ल सिक्युरीटीसह एक छोटा प्रवास करणे ही काही राज्य सरकारविरुध्दची लढाई नाही किंवा लोकल प्रवाशांच्या लढ्यात टाकलेली उडी नाही. त्यामुळे बऱ्याच प्रवाश्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, काहींनी ही स्टंटबाजी लक्षात घेऊन रोजच्याप्रमाणे आपले कामाचे ठिकाण गाठणे पसंत केले. याचे कौतुक होते फक्त मिडीयाला आणि कॉंग्रेसवाल्यांनाच. याउलट जे समस्त मुंबईकर दररोज न चुकता ही धक्केबाजी आयुष्यभर सहन करत आलेले आहेत व आजही करताहेत त्यांच्या जखमेवर फुल्ल सिक्युरीटीसह लोकल प्रवास करुन राजकुमारांनी मीठ चोळले आहे, या वस्तूस्थितीची जाणीव राजकुमारांना करून देण्याचे धाडस कॉंग्रेसमधील एकाही बुजुर्गाने दाखविले नाही.

पाच दहा मिनिटे लोकांमध्ये जाऊन मिसळणे, लोकलने एखादा प्रवास करणे, एखादी मातीची पाटी उचलून टाकणे, एखाद्या गरीबाच्या झोपडीत घरात जाऊन जेवण घेणे आणि आता शेतकऱ्यांसोबत आंदोलनात सहभाग घेणे ही नाटके राहुल गांधी फक्त कोंग्रेसेतर राज्यातच का करतात? काँग्रेसची सरकारे असलेल्या राज्यात राजकुमारांना यातील एकही समस्या दिसत नाही का? केवळ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकुमारांची ही स्टंटबाजी चालू आहे, हे न समजण्याइतपत जनता काही खुळी नाही. (पण मतदान करताना सर्वसामान्यांचा हा त्वेष कुठे लुप्त होतो हेच समजत नाही.)

राहुल गांधींना त्यांच्यावर होत असलेला हा स्टंटबाजीचा आरोप जर मान्य नसेल, तर त्यांनी हा आरोप खोडून काढण्याची सुरुवात म्हणून केवळ महाराष्ट्रच आपल्या या महान कार्यासाठी दत्तक घ्यावा. येथील शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, गिरणी कामगार, व्यापारी, नोकरदार, विद्यार्थी, महिला या सर्वांचे प्रश्न सोडविण्याचे धाडस त्यांनी दाखवावेच. केवळ काँग्रेसची सत्ता नसलेल्या राज्यात जाऊन ही स्टंटबाजी करण्याऐवजी, राजकुमारांनी सर्वप्रथम काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यातील जनता विविध समस्येखाली कशी पिचून चालली आहे याकडे लक्ष देऊन, आपल्याच पक्षाच्या सरकार विरुद्ध एल्गार पुकारण्याची हिंमतसुद्धा त्यांच्यात आहे हे त्यांनी आता एकदा सिद्ध करावेच.

1 Comments:

  1. केवळ काँग्रेसची सत्ता नसलेल्या राज्यात जाऊन ही स्टंटबाजी करण्याऐवजी, राजकुमारांनी सर्वप्रथम काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यातील जनता विविध समस्येखाली कशी पिचून चालली आहे याकडे लक्ष देऊन, आपल्याच पक्षाच्या सरकार विरुद्ध एल्गार पुकारण्याची हिंमतसुद्धा त्यांच्यात आहे हे त्यांनी आता एकदा सिद्ध करावेच.
    रमणजी, इतकं खरं-खरं नका लिहू हो ? त्रास होतो त्याचा ......वाचणारयांना.
    खर तर पक्ष म्हणून मला सर्वात कॉंग्रेसच आवडतो.अहो काही खायच्या गोष्टी नाहीयेत स्वातंत्रोत्तर ६३ मधील ५८ -५९ वर्षे अबाधित सत्ता गाजविणे म्हणजे!किती...... किती म्हणून हुशारी लागत असेल ? अन सगळ्यांनी मिळून मिसळून सगळं काही वाटून घ्यायचं,खायचं,प्यायचं ते हि बिनबोभाट, गुपचूप ...ह्या काही खायच्या गोष्टी नाहीयेत? शिस्त-शिस्त म्हणतात ती हीच.मागे संघाचे तेव्हाचे प्रमुख देवरस ह्यांनी उगीच नाही त्यांचे कौतुक केलं ?..शिस्ती बद्दल. अन राहता राहिली काही कुरकुर तर जर कसायाला गायचं धार्जीणी असेल तर त्याला तुम्ही नि आम्ही काय करणार ? कप्पाळ ?

    ReplyDelete